कोलकाता- हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्यांनी देशातील चित्रपट, तसेच कलास्थितीवर गुरुवारी २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाहीर भाष्य केले. ‘ऐतिहासिक चित्रपटांची सध्याची लाट म्हणजे अतिरंजित देशाभिमान आहे,’ असे स्पष्ट मत महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. तर, ‘सकारात्मकता जिवंत आहे,’ असे म्हणून सुपरस्टार शाहरुख खान याने सध्या सुरू असलेल्या टीकेला उत्तर दिले.
कोलकाता चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बच्चन व खान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महोत्सवाचा पडदा उघडताना बच्चन यांनी भूतकाळ व वर्तमानातील चित्रपटस्थितीवर भाष्य केले. ‘भारतीय चित्रपटसृष्टीने नेहमीच धैर्य व समानाधिकाराचा पुरस्कार केला. चित्रपटांमध्ये आता काळानुसार बराच बदल झाला आहे. पौराणिक चित्रपट व समाजवादी चित्रपट ते अँग्री यंग मॅन आणि अगदी आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक चित्रपटांपर्यंत बदल घडला आहे. सध्या अतिरंजित देशाभिमान व नैतिक राखणदारीचे पेव फुटले आहे. आजही चित्रपटांमधून नागरी अधिकार व स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत,’ असे अमिताभ म्हणाले.
शाहरुखनेही दिला सकारात्मक राहण्याचा संदेश
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पठाण’चा मुख्य नायक शाहरुखसोबत अमिताभ बच्चनही उपस्थित होते. चित्रपटावरील बहिष्कार आणि भगव्या बिकिनी वादावर अप्रत्यक्षपणे आपली प्रतिक्रिया दिली. शाहरुख म्हणाला की, बॉयकॉट ही संकुचित मानसिकता दर्शवते, जी व्यक्तीला सीमांमध्ये बंदिस्त करते. शाहरुख म्हणाला, ‘आम्ही सर्व आनंदी आहोत आणि मला सर्वात जास्त आनंद आहे की तुम्ही, मी आणि आपल्यासारखे सकारात्मक विचार करणारे लोक जिवंत आहेत. त्यामुळे जग काय करतंय याचा काही फरक पडत नाही.पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. शाहरुख आणि दीपिकाशिवाय या चित्रपटात जॉन अब्राहम दिसणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.