• Wed. Apr 30th, 2025

मुंबईतील मोर्चाआधीच महाविकास आघाडीने ट्रेलर दाखवला

Byjantaadmin

Dec 16, 2022

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने एक टीझर रिलीज करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओतून मोर्चाच्या आधीच भाजपविरोधात जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला आहे

महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य दाखवत चुकीचा इतिहास का सहन करायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शेतकरी त्रासलाय, नोकरदार ग्रासलाय आणि बेदरकार वक्तव्यांनी कळस गाठलाय, असं म्हणत महाविकास आघाडीने भाजपविरोधात आक्रमक होण्याचे संकेत या व्हिडिओतून दिले आहेत.

महाविकास आघाडीमार्फत शनिवारी मुंबईतील मोर्चा काढण्यात येणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगडसह राज्याच्या विविध ठिकाणांहून मोर्चेकरी आणण्याचे नियोजन अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आलं आहे.

हा मोर्चा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची अखंडता याविषयी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या भावनेशी निगडित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरही मोर्चाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात येणार असल्याचा संदेश जनतेपर्यंत नेण्याचे यावेळी ठरले. मोर्चास बसगाड्या, खासगी वाहनांशिवाय रेल्वे आणि लोकलने नागरिकांना आणण्याचे नियोजन असल्याचे आघाडीच्या एका नेत्याने सांगितलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *