माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरयांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. आंदोलकांचा रोष पाहता अशोकचव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचे पाहायला मिळाले.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी आले होते. मात्र, यावेळी ‘एक मराठा-लाख मराठा’सह विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोषपाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला.
नेमकं काय घडलं?
भाजपकडून नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण देखील गावागावात जाऊन प्रचार करत आहेत. गावकऱ्यांच्या भेठीगाठी घेऊन ते प्रचार करतांना दिसत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे अशोक चव्हाण प्रचारासाठी गेले होते. मात्र, गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचे म्हटले. त्यामुळे गावात येऊ देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेत जोरदार घोषणाबाजी केली. गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका पाहता अशोक चव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला.
पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप…
अशोक चव्हाण कोंढा गावात पोहचताच गावकरी एकत्रित जमा झाले आणि चव्हाण यांना गावात येण्यासाठी विरोध केला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचे म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अनेक तरुण थेट अशोक चव्हाण यांच्या गाडीसमोर आले. त्यामुळे गाडी पुढे घेऊन जाने देखील शक्य होते नव्हते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत अशोक चव्हाण यांच्या गाडीसमोर असलेल्या तरुणांना बाजूला केले आणि गाडीला जागा करून दिली. अशोक चव्हाण यांचा ताफा गावातून परत निघाल्यावर देखील ‘एक मराठा लाख मराठा’ असा घोषणा देण्यात आल्या.