• Mon. Apr 28th, 2025

काँग्रेस-वंचितचं ठरतंय? घडामोडींना वेग, आंबेडकरांसाठी बडे नेते सरसावले, समीकरणं बदलणार?

Byjantaadmin

Apr 1, 2024

मुंबई:VBA आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिस्कटली. यानंतर वंचितनं उमेदवारांची घोषणा केली. पण त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची प्रस्ताव दिला. त्यानुसार आंबेडकर नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. तशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

नागपूरमधून काँग्रेसनं आमदार विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात ठाकरे मैदानात असतील. तर कोल्हापुरातून काँग्रेसनं छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिलं आहे. तर शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली आहे. या दोन्ही जागांवर वंचितनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.काँग्रेसला एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी वंचितनं दर्शवली. कोल्हापूर आणि नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची घोषणा आंबेडकरांनी केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाकी पाच जागांची यादी वंचितला देणार आहेत. या पाच जागांवरही वंचित काँग्रेसला पाठिंबा देईल. त्यामुळे सात जागांवर काँग्रेससाठी निवडणूक काही प्रमाणात सोपी होऊ शकते.दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसकडून विचार सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातील उमेदवारी काँग्रेसकडून मागे घेतली जाऊ शकते. तसे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ‘आंबेडकर सात जागांवर आपल्याला पाठिंबा देत असतील, तर आपण अकोल्यातील उमेदवारीचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. याची माहिती हायकमांडला देण्यात येईल. त्यानंतर अकोल्याबद्दल निर्णय होईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.अकोल्यात काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांचं नाव काल झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. ते ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण आताच्या घडामोडी पाहता काँग्रेसकडून पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते. तशा हालचाली काँग्रेसच्या गोटात सुरू आहेत. आंबेडकरांनी वंचितची भूमिका मांडताना उद्धव ठाकरे, शरद पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला होता. पण काँग्रेसबद्दल त्यांची भूमिका आक्रमक नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed