• Mon. Apr 28th, 2025

अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून देशाच्या जनतेला दिल्या 6 गॅरंटी; पत्नी सुनिता यांनी दाखवल्या वाचून

Byjantaadmin

Mar 31, 2024

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषधार्थ इंडिया आघाडीचे २८ पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले आहेत. यावेळी झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी भाषण केलं. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश देखील जनतेला वाचून दाखवला.

केजरीवाल हे सच्चे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ईडीने त्यांना तुरुंगात टाकलं आहे. पण, खूप काळ ते त्यांना तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. ज्या हिम्मतीने आणि धैर्याने ते देशासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात ज्या पद्धतीने लोकांनी बलिदान दिलं, काम केलं. त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत, असं त्या म्हणाल्या.(

सुनिता केजरीवाल यांनी यावेळी अरविंद केजरीवाल यांचा संदेश सर्वांसमोर वाचून दाखवला. मी आज तुम्हाला मत मागत नाही. एक नवा भारत बनवण्यासाठी मी मदत मागत आहे. १४० कोटी नागरिकांना नवा भारत करण्यासाठी मी निमंत्रण देत आहे. भारत हा गौरवशाली देश आहे. हजारो वर्षांचा याला इतिहास आहे. तरी आपल्या देशातील लोक गरीब का आहेत? असं त्या म्हणाल्या.

मी सध्या तुरुंगात आहे. मला येथे विचार करायला खूप वेळ मिळतो. भारत मातेबाबत मी विचार करतो.भारत माता दु:खी आहे. लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नाही, उपचार मिळत नाही, शिक्षण मिळत नाही तेव्हा भारत माता दु:खी होते. काही नेते हायफाय जीवन जगतात अशा लोकांचा भारत माता द्वेष करते, असं त्या भाषणात म्हणाल्या.एका नव्या भारताचे आपण स्वप्न पाहूया. सर्व लोकांना रोजगार मिळेल. कोणी गरीब राहणार नाही. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. सर्वांना चांगले आणि मोफत उपचार मिळतील. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात २४ तास वीज असेल. गावागावात चांगले रस्ते असतील. विज्ञानामध्ये भारत अग्रेसर असेल. असा देश बनवूया जिथे सर्वजण समान असतील. बंधुभाव असेल अशा देशाची आपल्याला निर्मिती करायची आहे, असं केजरीवालांचा संदेश सुनिता यांनी वाचून दाखवला. त्या पुढे म्हणाल्या की, केजरीवालांनी तुरुंगातून देशाच्या जनतेला सहा गॅरंटी दिल्या आहेत.

केजरीवाल यांनी दिलेल्या सहा गॅरंटी

१.पूर्ण देशात चोवीस तास वीज पुरवठा देण्यात येईल. कुठेही पॉवर कट होणार नाही

२. संपूर्ण देशातील गरीबांचे वीज बील मोफत असेल

३. प्रत्येक गावात चांगली शाळा बनवली जाईल. गरीब-श्रीमंत न पाहता सर्वांना चांगले शिक्षण मिळेल

४. प्रत्येत गावामध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’ बनवले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल बनवले जाईल

५. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या एमएसपीनुसार धान्याला दर दिले जातील

६. दिल्लीच्या लोकांनी ७५ वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यांनी निवडून दिलेले सरकार पंगू आहे. त्यामुळे दिल्लीच्या लोकांना न्याय मिळवून देणार. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed