प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य युतीवर मोठं भाष्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मविआआणि वंचित यांच्यात युतीसंदर्भात चर्चा होत होती. मात्र अद्याप त्यातून काहीही ठोस असे समोर आलेले नाही. त्यामुळेच आत प्रकाश आंबेडकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता आम्ही महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे करणार आहोत, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे आता महाविकास आघाडीची मोठी अडचण होऊ शकते.

त्यांचं भांडण मिटलेलं नाही, आम्हाला दोष दिला जातोय
प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत आपापसात एकमत झालं नाही. आम्ही हेच सांगत होतो. आता मात्र ते स्पष्ट झालं आहे. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. महाविकास आघडीत ज्या मतदारसंघात मतभेद होते, ते मतभेद अजूनही कायम आहेत. याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा चालू आहे. म्हणूनच अगोदर तुमचे भांडण मिटवा असं आम्ही त्यांना सांगत होतो. मुळात त्यांचे भांडण मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते. त्यांच्यातील भांडण न मिटल्यामुळे आम्ही त्यांच्यात पडत नव्हतो. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी kolhapur आणिnagpur या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू.
आम्ही अनेक जागांवर निवडणूक लढवणार
प्रस्थापित नेत्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना सर्व पक्ष ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तिथे वंचितांसाठी जागा नाही. आम्ही जाहीर करतो की maharashtraतील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. इलेक्ट्रोल बाँड हा विषय निवडणुकीत महत्त्वाचा राहील. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय मुद्द्यांसह इतर मुद्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच त्यांच्यामधली भांडणं मिटलेली नाहीत. आता निवडणूक जवळ आली आहे. आम्ही या निवडणुकीची तयारी केली होती. त्याच तयारीच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. आम्ही महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत आमचे उमेदवार देणार आहोत, अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
…म्हणून ते आम्हाला दोन-तीन जागा देऊ असे सांगत होते
आज एकाच विचाराची माणसं, पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. 14 ते 15 मतदारसंघांत अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडी कॅटॅलिस्ट म्हणून भूमिका बजावू शकते, असे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दुर्दैवाने दोन गोष्टींची अडचण आहे, असं आम्ही मानतो. प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून आपण ही निवडणूक लढवुया, असं आम्ही सांगत होतो. मात्र याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा नकार होता. त्यामुळेच ते आम्हाला दोन आणि तीन जागा देऊ असे सांगत होते, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
….म्हणून मला पाचच मिनिटे देण्यात आली
त्यांना आमची दुसरी एक अडचण होती. ती अडचण मला राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेत दिसून आली. निवडणुकीत विरोधी पक्षाला अंगावर घ्यावं लागतं. टीकेला शस्त्र करावं लागतं. त्या सभेत मी अनेक गोष्टी मांडू शकतो आणि त्यांची अडचण होऊ शकतो त्यामुळे मला पाचच मिनिटे देण्यात आली. भाजप, संघ यांना अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. ही मविआसाठी अडचणीचं होतं. दुसरं म्हणजे विस्थापितांना सत्तेत सहभागी करून घेणं याला प्रस्थापितांनी कायम विरोध केला आहे. हेच मविआतही दिसलं, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.