लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. मात्र, मतदानाच्या आधीच भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. आठ मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात विरोधी पक्षाला उमेदवारच देता आले नाही. त्यामुळे भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.अरुणाचल विधानसभेसाठी 60 जागांवर तर लोकसभेसाठी दोन जागांवर मतदान होणार आहे. विधानसभेत भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने पेमा खांडू सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लोकसभेमध्येदेखील भाजपच्या उमेदवारांची बाजू भक्कम वाटत आहे.

‘हे’ आठ उमेदवार विजयी
मुख्यमंत्री पेमा खांडू, हेज अप्पा, मुच्छू मिठी, एर रतु टेची, तेची कासो, जिक्के ताको, न्यातो दुकोम, दसांगलू पुल हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. दसांगलू पूल अंजाव जिल्ह्यातील आयर्न लेडी म्हणून ओळखला जातो.
लोकसभेच्या रिंगणात 15 उमेदवार
विधानसभेच्या आठ जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मात्र, लोकसभेच्या दोन जागांसाठी तब्बल 15 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा आणि लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 जूनला, तर लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला जाहीर होणार आहेत.