सुधाकर श्रृंगारे यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने भाजपनंतर उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपच्या गोटात अजूनही फारसे उत्साहाचे वातावरण नाही. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात शनिवारी (ता. ३० मार्च) अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आणि या निमित्ताने एकत्र आलेल्या लातूर जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्याचे समजते.लातूर लोकसभा मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत भाजपची हॅट्ट्रीक झाली पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित येऊन सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा निवडून आणा, अशी ताकीदच फडणवीसांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड व इतरांना दिली. लगोलग लातूर लोकसभा निवडणुकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर यांची संयोजक म्हणून निवडही केली. त्यांना सहसंयोजक म्हणून अभिमन्यू पवार, रमेश कराड, किरण पाटील यांची साथ मिळणार आहे.एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये भाजपच्या हॅट्ट्रीकसाठी पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरच विश्वास दाखवल्याचे दिसून आले. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सुधाकर श्रृंगारे यांच्या उमेदवारीपासून त्यांना निवडून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत संभाजी पाटील निलंगेकर अग्रेसर होते. निलंगेकर यांनी त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आणि तब्बल 2 लाख 89 हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडूनही आणले.यावेळी मात्र संभाजी पाटील निलंगेकर हे उमेदवार ठरवण्यापासूनच्या प्रक्रियेपासून अंतर राखून होते. अगदी लातूर जिल्ह्यात झालेल्या महायुतीच्या संयुक्त मेळाव्यालाही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होती. लातूर जिल्ह्यात आधी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा आणि त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डाॅ. अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. पण, या प्रवेश प्रक्रियेतही निलंगेकर यांचा फारसा सहभाग नव्हता.

मुंबईत भाजप पक्ष कार्यालयातील प्रवेश सोहळ्याला निलंगेकर मात्र आवर्जून हजर होते. एवढेच नाही तर त्यांनी बसवराज पाटील, अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक यांच्यावरही निशाणा साधला. एकूणच लोकसभा निवडणुकीत लातूरात हॅट्ट्रीक साधायची असले तर निलंगेकर यांना ॲक्टीव्ह करणे गरजेचे होते. फडणवीसांनी त्यांच्यावर संयोजकपदाची जबाबदारी सोपवून एक प्रकारे श्रृंगारे यांच्या विजयाची गॅरंटीच घेतली आहे. पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकल्यामुळे संभाजी पाटीलही आता जोमाने कामाला लागतील. या निमित्ताने विरुद्ध दिशेला तोंड असलेले जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळी एकत्र पहायला मिळणार ?