गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचं बंड अखेर शमल्याचं दिसत आहे. शिवतारे यांनी आता बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे.विजय शिवतारे अखेर बॅकफूटवर आले आहेत. शिवतारे यांनी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्याने आता बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. म्हणजे पवार कुटुंबातच बारामतीत लढत होणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.

गुंजवणीचं पाणी पुरंदरला देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलं. आणि या कारणामुळे बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला. यामुळे आता बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या दोघींमध्ये आता निवडणूकीत लढत होणार आहे.
फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर बदलले सूर ?
दोन-तीन दिवसांपूर्वीच , बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली. तेथेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची रंगली होती. तेव्हाच शिवतारे हे माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिवतारेंनी निर्णय जाहीर केला नव्हता. अखेर आज ( शनिवार) शिवतारेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माघार घेत बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
काय होता वाद ?
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या. तर महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र महायुतीतील आणखी एक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हेदेखील बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होतेराज्यात चिखल झाला आहे. राज्यातील जनतेला नवीन पर्याय हवे आहेत. पवार पर्व संपण्यासाठी मी लढत आहे. जनतेला दुसरा पर्याय हवा असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली होती. त्यामुळे बारामतीच्या जागेचा पेच वाढला होता.मात्र आता शिवतारेंनी माघार घेतल्याने बारामतीचा तिढा सुटल्याचे दिसत असून आता सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे.