• Thu. May 15th, 2025

अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Mar 26, 2024

अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

• जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा

• अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके स्थापन

लातूर, दि. 26 : जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती होती.

जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांनी गतिमान कार्यवाही करून जिल्ह्यात होणारा अवैध पाणी उपसा रोखावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या. उपलब्ध पाणीसाठा, चारा, तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांचाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी आढावा घेतला.

अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांमार्फत कारवाई

जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आलेल्या पाणीसाठ्याचा उपसा करणाऱ्यांवर भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 86 विद्युतपंप जप्त करण्यात आले आहेत. तसेच 138 विद्युत स्टार्टर, 109 वायर बंडल जप्त करण्यात आले आहेत. तसेच 875 वीज कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. त्यामुळे कोणीही पाण्याचा अवैध पद्धतीने उपसा करू नये. तसेच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *