• Wed. Apr 30th, 2025

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा मंदावली!

Byjantaadmin

Dec 14, 2022

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले असून मंगळवारी मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दोन आठवड्याचा (१० दिवस) कार्यकाळही निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनात २१ विधेयके मांडली जाणार असून त्यावर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, विधिमंडळ इमारत परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात काढलेल्या तात्पुरत्या दिनदर्शिकेनुसार पहिल्या दिवशी (१९ डिसें.) दोन्ही सभागृहात अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, मंगळवार, बुधवारी शासकीय कामकाज, गुरवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा, शुक्रवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान आणि पुरवणी नियोजन विधेयक अशा स्वरुपाच्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सीमावाद, थोर पुरुषांबाबत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता पहिले दोन दिवस या मुद्यांवर दोन्ही सभागृहात वादंग होण्याची शक्यता आहे.

विधानभवनात सोमवारपासून वर्दळ वाढली आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले असून ओळखपत्र तपासूनच आत सोडले जात आहे. विधानभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर सुरक्षा कठडे लावण्यात आले आहे. रविवारी सर्व मंत्री नागपुरात दाखल होतील.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिवाळीत केली होती. त्यानंतर इच्छुकांच्या नावांबाबत चर्चाही सुरू झाली. आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आले तरी यावर कोणाही चर्चा करीत नाही. सध्या हा विषय मागे पडल्याचेच चित्र आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed