• Thu. May 15th, 2025

इंडिया आघाडीचा ३१ मार्चला महामेळावा

Byjantaadmin

Mar 25, 2024

नवी दिल्ली : देशाचे हित आणि लोकशाही रक्षण तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ येत्या ३१ मार्च रोजी इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे ‘आप’चे नेते गोपाळ राय यांनी रविवारी येथे सांगितले.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी त्यांच्या निवासस्थानातून अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने महामेळाव्याची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसने या मेळाव्याची रविवारी घोषणा केली.

देशात सध्या जे वातावरण आहे त्याबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही ३१ मार्च रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. इंडिया आघाडीतील अनेक दिग्गज नेते या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सध्या देश आणि लोकशाही धोक्यात आहे, त्यामुळे देशाचे हित आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडीने हा मेळावा आयोजित केला आहे, असेही गोपाळ राय म्हणाले.

केंद्र सरकारने हुकूमशाहीचा अवलंब करून देशातील लोकशाही संपवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. संविधान आणि लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या आणि त्याचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये यामुळे संताप निर्माण झाला आहे. प्रत्येक विरोधी नेत्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत, असे आप नेते राय यांनी सांगितले.

३१ मार्चला रामलीला मैदानात सकाळी १० वाजता इंडिया आघाडीकडून ही महारॅली आयोजित करण्यात आली असून या देशातील लोकशाही वाचवण्याकरता त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांत सातत्याने लोकशाहीवर हल्ला होत आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते. काँग्रेसची खाती निष्क्रिय केली जातात. आता प्रश्न निर्माण होतोय की रॅलीला परवानगी मिळेल की नाही. विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत, असा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी केला.

सरकारची दडपशाही – कॉंग्रेस

विरोधी पक्षांना नि:पक्षपातीपणाची वागणूक दिली जात नाही. काँग्रेस पक्षाची खाती गोठविण्यात आली आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. यातून सरकारची विरोधकांवर सुरू असलेली दडपशाही दिसून येते, असे दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदरसिंग लवली यांनी सांगितले. हा महामेळावा केवळ राजकीय नाही तर देशातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरुद्ध आ‌वाज उठविण्यासाठी आहे, असेही लवली यांनी स्पष्ट केले.

ईडी कोठडीतून केजरीवालांनी जारी केला पहिला आदेश

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कोठडीतूनच पहिलावहिला आदेश जारी केला. दिल्लीच्या काही भागांना पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या समस्या भेडसावत असून त्या तातडीने सोडविण्याचे आदेश केजरीवाल यांनी जलखात्याच्या मंत्री आतिशी यांना दिले. केजरीवाल यांचा आदेश आपल्याला शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. स्वत:ची अवस्था वाईट असतानाही केजरीवाल यांना दिल्लीकरांबाबत किती आत्मीयता आहे हे स्पष्ट होते, असे पत्रकार परिषदेत सांगताना आतिशी यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी केजरीवाल यांना मद्यघोटाळा प्रकरणी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने २८ मार्चपर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शहरातील ज्या भागात पाण्याची टंचाई आहे, तेथे टँकरने पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आदेशही केजरीवाल यांनी दिले आहेत. आपल्या सूचना मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासही केजरीवाल यांनी सांगितले आहे. गरज भासल्यास नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची मदत घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *