• Tue. May 13th, 2025

दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले

Byjantaadmin

Mar 24, 2024

नाशिक : राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणात्य सिनेमात देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे कोयता हा हल्ल्याचं प्रमुख शस्त्र असल्याचं जणू समोर येत आहे. गुन्हेगारांची दहशत त्यांचा उथळमाथ्याने समाजातील वावर राजकीय क्षेत्रात त्यांना प्राप्त होत असलेलं महत्त्व महागड्या गाड्या, गळ्यातील सोनं आधी बाबींमुळे त्यांना एक प्रकारचा ग्लॅमर प्राप्त झालं असल्याचं बघायला मिळतंय. मात्र कोयत्याचं आकर्षण आता गुन्हेगारीच्या बाहेर शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहचत आहे. त्याचं एक उदाहरण नाशिकच्या सातपूर परिसरातील एका शाळेत काल शनिवारी रोजी उघडकीस आलं आहे आणि सर्वत्र या घटनेनं खळबळ उडाली आहे.नाशिक शहरातील सातपूर हा परिसर कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सातपूर औद्योगिक वसाहत याच ठिकाणी असल्यामुळे या परिसरात हिंदी भाषिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सातपूर येथील एका हिंदी भाषिक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि या घटनेनं संपूर्ण सातपूर नव्हे तर, संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हिंदी भाषिक शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये चक्क एक कोयता आढळून आला आहे. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बॅग घेऊन जाण्याची परवानगी नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांनी परीक्षा रूमच्याबाहेर आपल्या बॅगा ठेवल्या होत्या. दहावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे एका विद्यार्थ्याने बाहेर ठेवलेली बॅग तेथे सुरक्षेला असलेल्या होमगार्डला संशयास्पद वाटली. होमगार्डने ती बॅग उघडून बघितली तर, तोच त्या होमगार्डला आश्चर्याचा धक्का बसला. त्या बॅगेत होमगार्डला चक्क कोयता आढळून आला. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोयत्याची काय गरज, कोयता नेमका कुठून आला? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होऊ लागले. या घटनेची माहिती होमगार्डने स्थानिक सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली. परीक्षा संपल्यानंतर पोलीस विद्यालयात दाखल झाले आणि बॅकसह विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी भाषिक महाविद्यालयात दहावीचे परीक्षा सुरू आहे. त्या ठिकाणी बंदोबस्तला असलेल्या होमगार्डला एका विद्यार्थ्याची बॅग संशयास्पदरीत्या मिळाली ती बॅग उघडून बघितली असता त्या बँकेत कोयता आढळून आला. होमगार्डने स्थानिक सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हेशोध पथकास त्या ठिकाणी पाचरण केले. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याला बॅगेसह ताब्यात घेतले. त्या विद्यार्थ्याची विचारपूस केली असता त्या विद्यार्थ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे योग्य ती कारवाई त्या विद्यार्थ्यावर केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून असे प्रकार पुन्हा घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील आवाहन पोलिसांनी पालकांना केलं आहे.मात्र, ही घटना गंभीर असून वेळीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये पाहायला मिळत आहे. असे प्रकार दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये घडत असल्यामुळे स्थानिक कामगार वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सातपूर परिसरात एक दिवसाआड गंभीर घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *