एकीकडे सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये संघर्ष सुरू असतानाच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच कर्नाटकची जाहीरात शहरभर फिरवली जात असल्याचे समोर आले आहे.
नागपूर विमानतळाबाहेरही जाहीरात
बेस्ट प्रशासनाच्या काही बसेसना संपूर्णपणे कर्नाटक सरकारच्या जाहीरातींनी रंगवण्यात आले आहे. जाहीरातीत ‘सी कर्नाटक अ न्यू’ म्हणजेच कर्नाटक नव्याने पाहा, असा मजकूर आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नागपूर विमातळाबाहेरही कर्नाटकची अशीच जाहीरात लावण्यात आली होती. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांनी ही जाहीरात फाडून टाकली होती. मात्र, आता मुंबईत बेस्ट बसेसवरच या जाहीराती रंगवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले आहे की, कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही. परंतु, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते.
तसेच, बेस्टवर अशा जाहीराती देण्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने विचार करायला हवा, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दोघेही दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. या बैठकीत नेमके काय होते? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहेच मात्र, बेस्टवरील या जाहीराती सरकार काढणार का?, हे देखील या भेटीवर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.