महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (जागावाटपावरून तणाव चालू आहे. अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीया पक्षाला सामावून घेण्यातही महाविकास आघाडीला (मविआ) अद्याप यश आलेले नाही. मविआने आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी 24 मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. मी (Akola) मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आमची अद्याप तयारी झालेली नाही
पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून जागावाटप झालेले नाही. असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते त्यांना आपला अर्ज भरण्यासाठी वेळ लागतो. ज्याच्या गुन्हेगारी रेकॉर्ड नाही तो दोन तासांतच उमेदवारी अर्ज भरतो. आम्ही आमच्या उमेदवारांचे रेकॉर्ड तपासलेले आहे. त्यामुळे आमच्या उमेदवारांचे अर्ज दोन तासांत भरता यावा, याची आम्ही काळजी घेतलेली आहे. आमची तयारी अद्याप झालेली नाही. आमची तयारी काय आहे हे आम्ही 26 मार्च रोजी सांगू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मी अकोल्यातून अर्ज दाखल करणार
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी चर्चा होती. ते नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज मात्र त्यांनी या चर्चेवर पडदा पाडला असून मी येत्या 27 मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे त्यांन सांगितले. तसेच मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही साथ देत नाही, असं चित्र निर्माण केलं जातंय
भाजपाकडून इतर पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातोय. इतर पक्षांना कमजोर केल्यावरच आम्हाला विजयी होता येईल, असे भाजपाला वाटत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. त्यांचा 15 जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेलं नाही. काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालत आहेत. तशा प्रकारचा गोंधळ आम्ही अद्याप घातलेला नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुमच्यातील 15 जागांचा वाद मिटवा. मात्र आम्हीच त्यांना साथ देत नाहीत, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्यातील 15 जागांचा वाद मिटलेला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी द्यावी, असेही आंबेडकर म्हणाले.