• Wed. May 14th, 2025

राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती

Byjantaadmin

Mar 23, 2024

मुंबई: महायुतीत राज ठाकरेंच्या रुपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. लोकसभेचं जागावाटप आणि युतीसंदर्भात त्यांच्यात ४० मिनिटं संवाद झाला. राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. पण त्यांना १ जागा मिळू शकते.महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत जाणार आहेत. राज यांच्या मनसेला किती जागा सोडायच्या याचा निर्णयही आजच होईल. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्याबद्दल संतापाची भावना आहे. मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राज यांच्या महायुतीतील संभाव्य प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.उत्तर भारतीय मजूर, छटपूजा यावरुन राज यांनी घेतलेली भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज यांची नकारात्मक प्रतिमा उत्तर भारतीयांमध्ये आहे. राज यांना सोबत घेतल्यास त्याचा फटका उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बसेल, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे आता मनसेच्या महायुतीतील प्रवेशाविषयीची चर्चा देशपातळीवर होणार नाही. याबद्दलचा निर्णय राज्य पातळीवरच घेण्यात येईल, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेऊ नका, असा सल्ला भाजपकडून मनसेला देण्यात आला आहे.

महायुतीत राज यांची एन्ट्री? जागा किती?
राज ठाकरेंनी भाजपकडे दोन जागांची मागणी केली आहे. दक्षिण मुंबईसह नाशिक किंवा शिर्डी अशा दोन जागा राज यांनी मागितल्या आहेत. राज यांच्या मागणीला शिवसेनेचा विरोध आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राज यांच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी या तिन्ही जागा मागील निवडणुकीत शिवसेनेनं जिंकल्या होत्या. तीनपैकी दोन खासदार शिंदेंसोबत आहेत. तर एक खासदार ठाकरेंसोबत आहे. हा तिन्ही जागा जिंकण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहे. या तीनपैकी दोन जागा मनसेला दिल्यास शिंदेंच्या सेनेचं मोठं नुकसान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *