संविधान सजग नागरिक बनले पाहिजेत-आनंद कंजे
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राज्यशास्त्र, लोकप्रशासन विभाग व ‘पुकार’ अशासकीय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान व मी या विषयावर परिसंवाद आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ‘पुकार’ या अशासकीय सेवाभावी संस्थेचे संविधान संवादक आनंद कंजे यांनी भारतीय संविधान व मी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशातील प्रत्येक नागरिक संविधान सजग बनले पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानाची माहिती पोहचली पाहिजे. तसेच, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाची मूल्ये प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजेत असे मत मांडले. विद्यार्थ्यांनी संविधानाबाबत जागरूक असले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांनी भारतीय संविधानातील अत्यंत वेधक व विशेष अशा बाबिंवर आधारित भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी या चित्रमय व माहितीपूर्ण अशा भितीपत्रकांच्या सहाय्याने भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये समजून घेतली. तसेच, याप्रसंगी राजमुद्रा स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर चे संचालक प्रा. डॉ. महेश मोरे यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून स्पर्धेशिवाय पर्याय नाही त्यामुळे तरुणांनी आपले लक्ष्य निश्चित करून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर आपल्याला नक्कीच यश मिळेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एन कोलपुके यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. डी एस चौधरी हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. व्ही पी सांडुर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस एस बदनाळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कमल गोमसाळे हिने केले. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा ंच्या बक्षीस वितरण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. तसेच, या प्रसंगी सामाजिक शास्त्रे विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
