सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Constituency) महायुती व महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे सस्पेन्स वाढला असून, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सावध पवित्रा घेत महायुतीचा (Mahayuti) उमेदवार कोण, त्यावरच राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याची भूमिका खुद्द पवारांनी घेतली आहे. ऐनवेळी नवीन चेहरा देण्याची तयारी त्यांनी केली आहे. सध्यातरी पक्षाकडून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने या नेत्यांची नावे पुढे आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती, महविकास आघाडीत उमेदवार निश्चितीचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे खासदारSharad Pawar) हे सातत्याने बैठका घेऊन या मतदारसंघातील नेमकी परिस्थिती जाणून घेत आहेत. त्यांच्या पक्षाकडून सध्यातरी श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने या दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.पण, यापैकी एकाही उमेदवाराला अद्याप त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो उमेदवार असेल, त्याचे काम करण्याच्या भूमिकेतून महाविकास आघाडीने तालुकानिहाय मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे महायुतीत खासदार उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) भूमिकेमुळे भाजपची अडचण झाली आहे. हा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले; पण उदयनराजे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत येथून उदयनराजेंनाच तिकीट मिळावे, अशी भूमिका घेतली.त्यांच्या भूमिकेमुळे महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. सध्या उदयनराजे भोसले हे उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबई, दिल्लीचे दौरे करत आहेत. त्यामध्ये त्यांना कितपत यश येणार? हेही औत्सुक्याचे आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे; पण समोर महायुतीचा उमेदवार कोण? त्यावर शरद पवार हे राष्ट्रवादीचा सक्षम व तोडीस तोड उमेदवार देणार आहेत. महायुतीकडून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली गेल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे.त्यांनी ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्यास नितीन पाटलांच्या विरोधात शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना उमेदवार देण्याचा विचार होणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी आपले मोहरे तयार ठेवले आहेत. ते आता विरोधकांच्या उमेदवारावर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे शरद पवार या वेळेस सातारा लोकसभेसाठी गेम प्लॅन खेळत आहेत. त्याचा अंदाज त्यांच्याच पक्षातील नेत्यांना नाही. त्यामुळे सर्वजण पवारांच्या भूमिकेकडे लक्ष ठेऊन आहेत.

वेट ॲण्ड वॉच…
सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी हालचालींचे केंद्र मोदीबाग हे निवासस्थान ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक येथे झाली. त्यावेळी साताऱ्यातील काही नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी साताऱ्यातून निवडणूक लढावी, अशी भूमिका घेतली. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला विक्रमी मतांनी निवडून आणतो, असा शब्दही त्यांनी दिला होता; पण पवारांनी वेट ॲण्ड वॉचचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची निवडणूक वेगळा संदेश देण्याची शक्यता आहे.