• Wed. May 14th, 2025

जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !

Byjantaadmin

Mar 22, 2024

जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !

लातूर, दि. 21 : जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाने आयोजित केलेल्या वन सफरीत सहभागी होत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे फुलांच्या, पक्षांच्या सान्निध्यात रमून गेल्या. यावेळी त्यांनी तीन तास वन सफर करीत साखरा उद्यानातील वृक्ष, पक्षी यांची माहिती जाणून घेतली.

सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, वनपरीमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, जैवविविधता समिती सदस्य शहाजी पवार, पक्षीमित्र राहुल जवळगे यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील या जैवविविधतेचे जतन संवर्धन करण्याबाबत त्यांनी वनाधिकारी व जैवविविधता समिती सदस्यांशी जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी मनमोकळा संवाद साधला. सर्वसाधारणपणे पक्षी व वन्यजीवांच्या निरीक्षणासाठी सूर्योदयाची वेळ योग्य असते, हे जाणून जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे ह्या सकाळीच साखरा उद्यानात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.  साखरा व अंकोली येथील वनक्षेत्राची जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली. माळरानावरील जैवविविधता, विविध वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे त्यांनी पाहीले.

वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रीम पाणवठे, तसेच शिकारी पक्षाच्या प्रजातीबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. वनपरीक्षेत्रात लावण्यात आलेली झाडे उन्हाळ्यातही जगावीत यासाठी त्यांनी पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यासाठी लोकसहभाग वाढवण्यातबाबत पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखरा येथील बटर फ्लाय गार्डन तसेच घनवनात असलेले विविध पक्षी व फुलझाडे यांची पाहणी केली. जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वन संरक्षणासाठी योगदाने देणारे वनरक्षक महेश पवार, बालाजी पाटील, सूर्यकांत घोगरे यांचे  जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *