• Wed. May 14th, 2025

…तर आम्हीही महायुतीचा धर्म पाळू शकणार नाही; अजित पवार गटाचा इशारा

Byjantaadmin

Mar 21, 2024

ठाणे : बारामतीमध्ये विजय शिवतारे महायुतीचा धर्म तोडण्याचा प्रयत्न करीत असतील तर लोकसभेच्या ज्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार उभा असेल तेथे राष्ट्रवादीचे पदाधिकारीही महायुतीचा धर्म पाळू शकणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढली असली तरीही ते बारामती लोकसभेमध्ये महायुतीचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावरून एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. बारामतीमध्ये शिवतारे हे महायुतीचा धर्म तोडण्याचा प्रयत्न करीत असतील तर, लोकसभेच्या ज्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार लढणार आहे. तिथे राष्ट्रवादीचे पदाधिकारीही महायुतीचा धर्म पाळू शकणार नाहीत, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना समज दिल्यानंतरही त्यांच्याकडून वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण गढूळ होईल असे कृत्य करायचे नाही.

शिवतारे हे महायुतीच्या दुधात मीठाचा खडा टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ मध्ये दाखविली असेही पंराजपे म्हणाले. कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून येथील लोकसभा कमळ चिन्हावर लढविली जावी अशी मागणी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराने आपल्या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भावना वरिष्ठांकडे मांडली आहे. यामध्ये काही गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *