• Tue. May 13th, 2025

जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार

Byjantaadmin

Mar 20, 2024

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी आंतरवली सराटी येथे मनाेज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या रविवारी ( २४ मार्च) होणाऱ्या बैठकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षण मिळविण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचा सूर भाजपविरोधी होतो का, तसे झाल्यास निवडणुकीमध्ये अधिक संख्येने उमेदवार उभे करायचे का, यासह अनेक विषयांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

२४ तारखेच्या निर्णयाच्या आधारे ‘मराठा मतपेढी’ला काय दिशा मिळेल यावर राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दिवशी होळीचा सण आहे. आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या एकत्रिकरणाचा लाभ होऊ शकतो काय याची चाचपणी बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाची मागणी पुढे रेटणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली.

जरांगे यांनी १० टक्के आरक्षण नाकारुन ‘ओबीसी’मधूनच आरक्षण देण्यासाठी ‘सगेसोयरे’ची मागणी लाऊन धरली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात जरांगे यांच्या निवडणूक विषयक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ASHOK CHAVHAN यांनी मध्यरात्री जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ‘ही भेट व्यक्तीगत स्वरुपाची होती. त्यांची भेट घेण्यास मला कोणी सांगितले नव्हते. मात्र, शासनाकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांना दिली. त्यांच्याशी चर्चा झाली. पण ती राजकीय स्वरुपाची नव्हती,’ असा दावा अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला.भाजप व शिवसेनेमध्ये ‘मराठा मतपेढी’वरुन चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा कोणाला द्यायची, याचा तिढा सुटलेला नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे विनोद पाटीलही निवडणुकीसाठी इच्छुक असून शिंदेगटाकडून उमेदवारी मिळावी असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व मंडळीमध्ये २४ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजीनगर JALNA बीड, नांदेड, धाराशिव LATUR आणि हिंगोली या मतदारसंघावर ‘मराठा मतपेढी’चा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघातील नेत्यांमध्ये २४ मार्चला काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. या अनुषंगाने आंतरवली सराटीमधील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असणारे प्रदीप सोळंके म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा की नाही, मोठ्या संख्येने उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय मनोज जरांगे हेच घेतील.’ बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीलाही ‘मराठा मतपेढी’मुळे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे २४ मार्चच्या बैठकीबाबत बीड लोकसभा मतदारसंघातही उत्सुकता वाढलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *