• Tue. May 13th, 2025

निवडणूक लढवा, तुतारी हाती घ्या! कार्यकर्त्यांचा दबाव, मोहिते पाटील घेणार मोठा निर्णय?

Byjantaadmin

Mar 20, 2024

सोलापूर: माढ्यातून निवडणूक लढविण्याचे धाडस करा, भाजप उमेदवार बदलत नसेल तर धैर्यशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या, असा प्रचंड दबाव समर्थकांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आणला आहे.भाजपने मोहिते पाटील यांना डावलले आहे. मोहिते पाटील समर्थक नाराज आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यांना केलेली मदत, मोहिते पाटलांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची सुरू असलेली चौकशी व इतर प्रकरणे पाहता भाजपसारख्या महाशक्तीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविण्याचे धाडस मोहिते पाटील करणार का? याबद्दल आजही स्पष्टता दिसत नाही.

शरद पवार यांनी MADHA LOKSABHA सुरुवातीपासूनच उमेदवारीबाबत डावपेच आखल्याचे दिसते. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णय असल्याने माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात झालेली निराशा, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात झालेल्या ओबीसी मेळाव्यात घेतलेली उघड घेतलेली भूमिका या बाबी जानकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

डॉ. देशमुखांचेही नाव

सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाबद्दलही चाचणी सुरू आहे. गणपतराव देशमुख यांचे ऋणानुबंध सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत होते. या ऋणानुबंधाचा व माढा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाच्या मतांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरदचंद्र पवार) होण्याची दाट शक्यता आहे.

तिघांवर जबाबदारी

भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील समर्थक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर समर्थकांच्या नाराजीचा भडका उडाला आहे. रामराजे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचा व शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये नुकतीच बैठक झाली.

MADHA LOKSABHA उमेदवारी व भूमिका यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मोहिते, निंबाळकर व जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत. या तिघांनीही अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.

निर्णयापूर्वीच गाठीभेटींना सुरुवात

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील अकलूजमध्ये हजेरी लावली होती. मोहिते पाटील समर्थकांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आज माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी व नाराजी याबद्दल खलबते सुरू होती. माढ्यातील उमेदवारीचा तिढा असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातून गाठीभेटींना आजपासून सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *