• Thu. May 8th, 2025

राजाचा जीव ‘ईव्हीएम’मध्ये! राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Byjantaadmin

Mar 18, 2024

मुंबई : या देशाच्या राजाचा जीव ‘ईडी, सीबीआय आणि ईव्हीएम’मध्ये दडला आहे. त्यांच्याशिवाय नरेंद्र मोदी कोणतीही निवडणूक जिंकूच शकत नाहीत, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी शिवतीर्थावरील सभेत केला. भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. निवडणूक रोख्यांमधून ही बाब दिसून आली आहे. पैसा द्या अन् कंत्राट घ्या, अशा प्रकारची पॉलिसी देशात सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

सभेला प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ६३ दिवसांनंतर रविवारी मुंबईत समारोप झाला. त्यानंतर शिवतीर्थावर राहुल गांधी यांची सभा पार पडली. राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाव भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आमची लढाई केवळ भाजप किंवा एकट्या नरेंद्र मोदींविरोधात नाही. कारण नरेंद्र मोदी हे केवळ एक ‘मुखवटा’ आहेत. या एका व्यक्तीचा चेहरा पुढे करून हे सगळे चालले आहे. एक शक्ती हे सगळे चालवत आहे. आमचा लढा या शक्तीविरोधात आहे. ही शक्ती ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्समध्ये दडली आहे. देशातील हजारो लोकांना याच शक्तीचा वापर करून घाबरवून भाजपमध्ये नेण्यात येत आहे. आमचा लढा याच शक्तीविरोधात असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील जाहीर सभेत स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाहीत. त्यांची ५६ इंचांची छाती वगैरे काही नाही. हा सगळा पोकळ वासा असल्याची टीकाही त्यांनी केली. आज देशातील शेकडो प्रश्न पुढे येऊच दिले जात नाहीत. मीडियात तर नाहीच पण सोशल मीडियावर देखील यांचेच नियंत्रण आहे. त्यांना वाचा फोडण्यासाठीच मी ही भारत जोडो यात्रा काढल्याचे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत झाला. त्यानिमित्ताने शिवतीर्थावर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी म्हणाले, आज देशात शेतकऱ्यांपासून अग्निवीरपर्यंत अनेक मुद्दे आहेत. पण मीडियात ते दिसून येत नाहीत. महाराष्ट्रातलेच एक मोठे नेते काँग्रेसला सोडून गेले. सोनियांसमोर ते रडले. म्हणाले की मला लाज वाटते, कारण माझ्यात या शक्तीविरोधात लढण्याची ताकद नाही. मला जेलमध्ये जायचे नाही. ते एकटेच नाहीत अशा प्रकारे हजारो लोकांना घाबरविण्यात आले आहे. शिवसेना, काँग्रेसचे नेते काय असेच गेले, नाहीत. या शक्तींनीच त्यांचा गळा पकडून त्यांना भाजपमध्ये नेले, असे राहुल गांधी म्हणाले.

मणिपूरपासून सुरू करून यात्रेचा समारोप धारावीत करण्याचा निर्णय घेतला. चीनमधील शेनझेन शहराच्या तोडीस तोड काम धारावी करू शकते. येथील लोकांना आर्थिक पाठबळ दिले तर ‘मेड इन चायना’ला धारावी तोंड देऊ शकते. आज देशातील ७० कोटी जनतेकडे जितकी संपत्ती आहे, तेवढा पैसा देशातील २२ लोकांकडे आहे. आज देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवायला वर्षे लागतात. पण एका लग्नासाठी दहा दिवसात विमानतळ तयार होते. देशातील ९० प्रमुख अधिकारी जे धोरणे बनवतात त्यात फक्त तीन दलित आणि एक आदिवासी आहे, असेही गांधी म्हणाले.

आपल्याला लढलेच पाहिजे – प्रकाश आंबेडकर

इलेक्टोरल बाँडचा विषय आहे. अमित शहा बोलत आहेत की काळा पैसा दूर केला. पण माझा सवाल अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. ‘फ्युचर गेमिंग’ कंपनीने १ हजार ३६० कोटींचे बाँड घेतले आहेत. याबाबत मोदींना प्रश्न विचारणार आहोत. ईडीची चौकशी करणार होते पण चौकश्या थांबल्या आहेत. असे वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवतीर्थावर राहुल गांधींकडून छत्रपती शिवराय,बाळासाहेबांना वंदन

राहुल गांधी शिवाजीपार्कवरील सभेला आले. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. उद्धव ठाकरे देखील यावेळी सोबत होते. राज्यातील राजकीय घडामोडींनंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस सोबत आले आहेत. यामुळे राहुल गांधी यांनी प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना येऊन वंदन केले आहे.

‘भाजप चले जाव’चा नारा दिला पाहिजे – शरद पवार

आज देशाची जी स्थिती आहे त्यात बदल आणण्याची गरज आहे. आपण सगळे एकत्र येऊनच हा बदल आणू शकतो. आज ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी शेतकरी, मजूर, महिला, दलित, आदिवासी यांना आश्वासने दिली होती, पण ती पूर्ण न करणाऱ्यांना दूर केलेच पाहिजे. म्हणून आज आपण ‘भाजप चले जाव’चा नारा दिला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

…तेव्हा हुकूमशाहीचा अंत होतो – उद्धव ठाकरे

हुकूमशहा कितीही मोठा असला तरी जनता जेव्हा एकवटते तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. ‘अब की बार भाजप तडीपार’ची सुरुवात झाली आहे. हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात रणशिंग फुंकायचे आहे. लोकशाही रक्षणाची आपली लढाई आजपासून सुरू होते आहे. ज्यांना घाबरवून पक्षात घेत आहात ते काही देशाची जनता नाही.

कितीही अत्याचार करा त्याला मोडून तोडून टाकू. गावागावात जा आणि हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असे आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले. भाजप हा फुगा आहे. त्या फुग्यात हवा भरण्याचे काम आम्हीच केले. चारशे पारचा दावा ते करतात पण त्यासाठी काय फर्निचरचे दुकान काढले आहे का, असा सवाल त्यांनी केला. आज आम्ही विरोधी पक्षात जरूर आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. घराणेशाहीचा आरोप आमच्यावर करता. पण तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची इतकाच परिवार आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *