समाजवादी पक्षाचे नेते आझम खान याांना रामपूरच्या डूंगरपूर प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने आझम खान यांना सात वर्ष कारावास आणि सात लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.विशेष कोर्टाने खान यांना घरात घुसून मारहाण, तोडफोड करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. यापूर्वी मुलाच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच हेट स्पीच प्रकरणात देखील आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा यापूर्वी झाली आहे. ते सध्या सीतापूर तुरूंगात कैदेत आहेत. आझम खान यांच्यासोबत रिटायर्ड सीओ आले हसन, माजी पालिकाध्यक्ष अजहर खान आणि ठेकेदार अली यांना देखील सात-सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात डूंगरपूर येथे विभागीय योजनेअंर्घत घरे बांधण्यात आली होती. या जागेवर आधीच काही घरे उभी होती. त्यानंतर जमीन सरकारी असल्याचे सांगत २०१६ मध्ये ती घरे पाडण्यात आली. भाजप सरकार आल्यानंतर जेव्हा आझम खान यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला तेव्हा २०१९ मध्ये डूंगरपूर येथील रहिवासी एहतशाम खान यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
यामध्ये आझम खान, आले हसन, अजहर खान, ठेकेदार बरकत अली, फरहान खान, जिबरान आणि सपा नेते ओमेंद्र चौहान यांच्यावर घरात घुसून मारहाण, लुटपाट केल्याचा आरोप ठेवण्यात आला. यासोबतच घरावर कब्जा केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला.या प्रकरणाची सुनावणी एमपी-एमएलए कोर्ट (सेशन ट्रायल) मध्ये सुरू होती. कोर्टाने आझम खान, अझहर खान, आले हसन, बरकत अली यांना ४९५, ४१२, ४५२, ५०४,५०६,४२७ आणि १२० बी या कलमांतर्गत दोषी ठरवलं. सर्व कलमांमध्ये आझम खान आणि इतर तीन लोकांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.