महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा सुटेल तेव्हा सुटेल, नांदेडची जागा काँग्रेसला सुटणार आहे हे निश्चित आहे. तसेच माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना पक्ष उमेदवारी देईल, याची गॅरंटी असल्याने त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे. नांदेडची जागा ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. पण भारतीय जनता पक्षाने राज्यातील ज्या जागा त्यांच्याकडं आहेत व जिथे वाद नाही अशा 20 जागेवर उमेदवार घोषित करून महाविकास आघाडीला मागे टाकले आहे.

नांदेड जिल्ह्यात काॅंग्रेसची परिस्थिती ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोंधळाची झाली आहे. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण गेल्याने काॅंग्रेसला सुरूपासून निवडणुकीची तयारी करावी लागत आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी तगड्या उमेदवारचा शोध काॅंग्रेसने सुरू केला आहे. हा शोध माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावावर थांबला आहे. काॅंग्रेस कमिटीने त्यांच्या नावाचा ठराव करून शिफारस केली आहे. त्यामुळे वसंतराव चव्हाणांना आपल्या उमेदवारीबाबत गॅरंटी असल्याने नायगाव भागात जनसंपर्क सुरू केला आहे.
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन दोन प्रभारी जिल्हाध्यक्षांची व पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीचे शहरातील काॅंग्रेस कमिटीच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यात काॅंग्रेसची विचारधारा मानणारा खूप मोठा मतदार आहे. भाजपची हुकूमशाही मोडून काढण्यात येईल. तसेच नांदेडची जागा काँग्रेस ताकदीने लढवेल, असे सांगण्यात आले आहे.
काॅंग्रेसला नांदेडची जागा यंदा प्रथमच अशोक चव्हाण हे काॅंग्रेसमध्ये नसताना लढवावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाची निवडणूक तयारी, अशोक चव्हाण यांचे नियोजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची स्वतंत्र निवडणूक यंत्रणा या आव्हानाला सामोरे जात काॅंग्रेसला नांदेडचा गड पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे.
काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण हे दोन वेळा नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच एक वेळ विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा नायगाव, उमरी धर्माबाद या भागात चांगला जनसंपर्क आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराशी चांगली लढत देऊ शकतात, असे बोलले जात आहेत.