आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेश पुजन करतो. आज नागपुरात आहोत. तर, टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन’, अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात करत जनतेशी संवाद साधला.
समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, राज्यात डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. समृद्धी महामार्गामुळे केवळ नागपूर-मुंबई नव्हे तर राज्यातील 24 जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडली जाणार आहेत. शेतकरी, उद्योजक, विविध धार्मिक स्थळांना जाणारे भाविक यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होणार आहे.
विरोधकांवरही निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे. या वाक्यातून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे आपवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. तर, काही पक्षांची विकासाची कामे म्हणजे आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी आहेत. यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असेही मोदी म्हणाले.