निवडणूक विषयक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा
लातूर, : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. प्रत्येक पथकाने निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए. जी. चाटे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यात निवडणूक खर्च, नामनिर्देशनपत्र, कायदा व सुव्यवस्था, विविध अॅप्लिकेशन्स आणि सायबर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, मतदार चिठ्ठी वितरण, भरारी पथके आदी बाबींसाठी नियुक्त पथक प्रमुखांचा आढावा घेण्यात आला.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पथकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे या पथकांचे प्रमुख आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देश आणि नियमांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करावे. तसेच सर्व पथकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून निवडणूक विषयक कामकाज पार पाडावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.