Latur: “तुम्ही एसआयटी (SIT) चौकशी सुरू केली आहे. काय चुकले आमचे? तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात आहे,” असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला. फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे,” असा इशाराच जरांगेंनी दिला.”देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या दिवसांत मराठ्यांच्या सभा काय असतात, त्या बघाव्यात,” असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना लातूरच्या अहमदपूर येथील संवाद बैठकीत दिला. फडणवीसांनी विनाकारण मराठा समाजाबाबत द्वेष व्यक्त केला आहे. राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, महिलांवर गुन्हे दाखल करणे सरकारकडून सुरू आहे. सध्या तरी मी राज्यात संवाद बैठका घेत आहे, माझी SIT चौकशी हे फक्त नाटक आहे. सरकारने फक्त मला अटक करून दाखवावं,” असं जरांगे म्हणाले.

शरद पवारांनाही विरोध करेल…
“शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे,” असे आरोप माझ्यावर सातत्याने होत आहेत. मात्र, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचे ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवार) रात्री लातूरच्या अहमदपूर येथे त्यांनी मराठा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली आहे, तर आज लातूरच्या निलंगा, कासार -शिरशी, आणि लातूर शहरात नागझरी ठिकाणी मराठा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांचीदेखील जरांगे भेट घेत आहेत.