नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. राजकीय पक्षाकडून निवडणूकीची तयारी करण्यात आली असली तरी पक्षांमध्ये उमेदवारीबाबत पेच कायम आहे. त्यातच नांदेडमध्ये देखील महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रम कायम आहे. दुसरीकडे बॅक फुटवर आलेल्या काँग्रेसकडून पक्षातीलच बलाढ्य उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यातच आता पक्षातील जेष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा देखील सुरु आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्ष सोडून गेले असले तरी दुसऱ्या चव्हाणांना निवडणूकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे.नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्याने काँग्रेसचा गड ढासळला आहे. काँग्रेसचे अनेक जण अशोक चव्हाण यांना समर्थन देत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. बॅक फूटवर गेलेल्या काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. सुरुवातीला शेकापच्या प्रदेशाध्यक्षा तथा भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राहिलेले प्रा.यशपाल भिंगे यांच्या नावाची चर्चा देखील सुरु होती. त्यातच आता माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाला काँग्रेसकडून पसंती दिली जात आहे. लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वसंत चव्हाण हे जेष्ठ नेते असून ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. नायगाव, बिलोली मतदार संघात त्यांचं वर्चस्व देखील आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा बेटमोगरेकर आणि कदम यांच्यावर
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात देखील केली जात आहे. याच अनुषंगाने काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर आणि बी.आर.कदम यांची निवड करण्यात आली आहे. शिवाय राजेश देशमुख, शमीम अब्दुल्ला, पप्पू कोंढेकर, सुभाष राठोड, गंगाधर सोंडारे यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
उमेदवाराबाबत भाजपात संभ्रम
नांदेडची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी सोपी मानली जात आहे. मात्र, उमेदवार कोण याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मीनल खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. उमेदवारांच्या संभाव्य यादीत मीनल खतगावकर असल्याची चर्चा देखील सुरु आहे. भाजपकडून मीच उमेदवार, असा दावा खासदार चिखलीकर यांच्याकडून केला जात आहे. मात्र, मंगळवारी मीनल खतगावकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने नांदेडच्या राजकारणात तर्कवितर्क लावले जात आहे. पण अद्यापही उमेदवार कोण? याबाबत स्पष्ट न झाल्याने भाजपात संभ्रमाची परिस्थिती आहे.