• Thu. May 1st, 2025

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला!

Byjantaadmin

Mar 10, 2024

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला!

– वैभव, रणजित, निखिल, नितीन, साकेत, दिग्विजय यांना सुवर्णपदक

उदगीर : क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी प्रâी स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, कोल्हापूरचा नितीन कांबळे व पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूर आणि पुण्याचा मल्लांचा बोलबाला बघायला मिळाला.
 उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. प्रâी स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात शेतकर्‍याचा मुलगा आणि गतविजेत्या कोल्हापूरच्या रणजित पाटील यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवित या स्पर्धेत दुसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला १०-० गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या निलेश हिरूगडेचा ३-० गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निलेशला रौप्यपदकावर मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व सातार्‍याचा ओंकार फडतरे यांनी कांस्यपदक जिंकले. ९७ किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अंतिम लढतीत साकेतकडून ११-० फरकाने दारूण पराभव झाल्याने कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक मिळाले. सोलापूरचा लक्ष्मण पाटील व सातार्‍याचा अजय थोरात यांना कांस्यपदके मिळाली.

इतर अंतिम निकाल (ग्रीको रोमन) : ५५ किलो : वैभव पाटील (कोल्हापूर) वि.वि. संकेत पाटील (कोल्हापूर) ९-०; कांस्यपदक : चेतन पगारे (जळगाव) व स्वप्नील भिंगार (सोलापूर). ७७ किलो : नितीन कांबळे (कोल्हापूर) वि.वि. सुशांत पालवे (सोलापूर) ९-०; कांस्यपदक : विष्णू तातपूरे (लातूर) व विश्वजित पाटील (कोल्हापूर). १३० किलो : दिग्विजय भोंडवे (पुणे जिल्हा) वि.वि. प्रतिक देशमुख (पुणे शहर) : ८-०; कांस्यपदक : अक्षय शेळके (लातुर) व भुषण पवार (सांगली).

(चौकट..)
सांगलीच्या प्रतिक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण
डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत स्व. खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो गटात सलग दुसर्‍या वर्षी सुवर्णपदक जिंकले. पोलीस हवालदाराची मुलगी असलेल्या प्रतिक्षाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोल्हापूरच्या वेदिका सासणेचा ७-१ गुण फरकाने धुव्वा उडविला. वेदिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पुणे जिल्ह्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. ५९ किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला कांस्यपदक मिळाले. ५० किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

(चौकट)
महिला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– उदगीर सारख्या ग्रामीण भागात कुस्तीच्या होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे या भागातील नागरिकांना मोठे अप्रूप वाटत आहेत. या कुस्ती स्पर्धेत मुलीही कुस्ती खेळणार असल्याने कुस्ती पाहण्यासाठी दर्शक गृहांमध्ये महिला दर्शकांची लक्षणीय उपस्थिती व त्यांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंना उत्साह देणारा होता. दर्शकांसाठी 4000 दर्शक बसतील अशी सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. हे संपुर्ण दर्शकगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *