महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या पेटला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर हा वाद निवळण्याची आशा होती. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन काहीही होणार नाही असं सांगत थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. यावर ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना टीका केली आहे.
बोम्मई यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं असून महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलं आहे. “महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,” असं बोम्मई म्हणाले आहेत.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांना कदाचित केंद्र सरकारचे आशीर्वाद असतील. पण आम्ही काल जेव्हा अमित शाह यांना भेटलो तेव्हा त्यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि १४ तारखेला दोन्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं सांगितलं. पण हे लोक केंद्र आणि वरिष्ठ नेत्यांनाही जुमानत नाहीत असा अर्थ होतो,” अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली
न्यायिक व्यवस्थेला तुम्ही मानता की नाही? सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित असतानाही अशी वक्तव्यं केली जात आहेत. त्यांनी याआधीही अशा गोष्टी करुन दाखवल्या आहेत. देशाच्या संविधानाला, न्यायव्यस्थेला जुमानायचं नाही असं त्यांनी ठरवलं आहे. केंद्राने याची गंभीर दखल घेतली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. “भाजपाचे इतके खासदार असताना, राज्य सरकार असतानाहीही कोणतीच भूमिका घेतली जात नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.