मुंबई: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसत आहेत. आचारसंहिता लागण्यास काहीच दिवस शिल्लक असल्यानं मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. पुढच्या आठवड्यात ११ आणि १२ मार्च (सोमवार आणि मंगळवार) असे सलग २ दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एका आठवड्यात सलग २ दिवस मंत्रिमंडळ बैठक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती सुत्रांनी दिली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. त्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायचे आहेत. याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णय मार्गी लावायचे आहेत. याचमुळे पुढील आठवड्यात सलग २ दिवस मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आधीचा अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

शासन निर्णय जारी करण्याची लगबग
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासन निर्णय जारी करण्याची धावपळ मंत्रालयात सुरू आहे. अनेक योजनांसाठी किंवा सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. पण त्यांचे जीआर जारी झालेले नाहीत. जीआर जारी झाल्याशिवाय प्रत्यक्ष निधी मिळत नाही. त्यामुळे आमदारांची अडचण होते.प्रलंबित जीआर काढण्यासाठी सध्या मंत्रालयात बरीच लगबग सुरू आहे. मंत्रालयात, मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यांगतांची संख्याही वाढली आहे. बदल्या आणि निधीसाठी लोकांची गर्दी मंत्रालयात होताना दिसत आहे. काही विभागांमध्ये तर फाईल तयार होण्याआधीच जीआर काढण्याची घाई सुरू आहे.