• Wed. Apr 30th, 2025

युवकांमधील नेतृत्व गुणांच्या विकासासाठी नेहरू युवा केंद्र उत्तम व्यासपीठ- मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

Byjantaadmin

Mar 8, 2024

युवकांमधील नेतृत्व गुणांच्या विकासासाठी नेहरू युवा केंद्र उत्तम व्यासपीठ– मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

लातूर, (जिमाका): युवकांतील नेतृत्त्व गुण  विकासासाठी नेहरू युवा केंद्र एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत लातूर नेहरू युवा केंद्राच्यावतीने दयानंद कला महाविद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड होते.

छाया मलवाडे, प्रा. अनिलकुमार माळी, जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, उपप्राचार्य प्रशांत मन्नीकर, डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. विलास कोमाटवाड व संजय ममदापुरे यावेळीउपस्थित होते.

 जिल्ह्यातील युवकांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, समाजातील विविध समस्या व्यासपीठावर मांडता याव्यात, या उद्देश्याने आयोजित जिल्हास्तरीय युवा संसद हा एक स्तुत्य उपक्रम आहे. जिल्ह्यातील युवकांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले नेतृत्व गुण विकसित करून जिल्ह्याचे  नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन श्री. सागर यांनी यावेळी केले.प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी लातूर नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्ह्यातील युवकाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन युवकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले.

लातूर नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यास्तरीय संसदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांनी  आतापर्यंत दोन वेळा नवी दिल्ली येथील संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. लातूर नेहरू युवा केंद्रामार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम युवकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण आहेत, असे मत प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.प्रथम सत्रात प्रशांत साबणे यांनी ‘माय भारत पोर्टल’चे महत्व विषद करत पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. मुख्य मार्गर्दर्शक छाया मलवाडे, यांनी नारी शक्तीचे  महत्व विषयावर, तसेच प्रा. अनिलकुमार माळी यांनी भरड धान्याचे दैनंदिन आहारात महत्व याविषयावर मार्गर्दर्शन केले. शेवटच्या सत्रात अभिरूप संसदेचे सादरीकरण दयानंद महाविद्यलयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी केले. अभिरूप संसदेसाठी प्रा. विलास कोमाटवाड यांचे मार्गर्दर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. गोपाळ बाहेती यांनी केले, तर डॉ. दिलीप नागरगोजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नेहरू युवा केंद्राचे कार्य उत्कृष्टरित्या केल्याबद्दल राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशांत साबणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय ममदापुरे, रविकांत गुंजीटे, प्रवीण पवार, खुशाल बिरादार, भारती  पोटभरे, अविनाश दुमपल्ले, शेख मुजाहिद खलील, रोहित काळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *