क्षेत्र कोणतेही असो त्यात आपला ठसा उमटवा- अशोक पाटील निलंगेकर –
निलंगा – बदलत्या काळानुरूप शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहेत.त्यानुसार ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेल्या घटना तात्काळ समाजासमोर येत आहेत, अशा विकसित झालेल्या तंत्रज्ञानात आपण मागे पडतो की काय अशी भीती वाटणे साहजिक आहे. पण, आपण जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रात असे काही काम करा की त्यात आपला ठसा उमटला पाहिजे .यासाठी आपल्याला जी संधी मिळेल त्या संधीचे आपण सोने करावे . असे मत स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र महाविद्यालयातील पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कला, विज्ञान, वाणिज्य, संगणकशास्त्र, व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४०३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शै. वर्ष २०२२-२३ मध्ये आठ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले यातील काही विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड ही झालेली आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले की, विद्यार्थी ज्ञान ग्रहण करताना, देणारा ज्ञानी असेल तर विद्यार्थ्यांच्या ज्ञान ग्रहणाचे चीज होते. चांगल्या शैक्षणिक वातावरणाचा परिणाम हा ज्ञान ग्रहणासाठी होतो. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पाऊलवाटेवर सर्व विद्यार्थी समर्थपणे वाटचाल करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव श्री बब्रूवानजी सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवजी कोलपुके, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवतजी पौळ, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा, विद्यार्थी कल्याण मंडळ, या सर्व विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गोविंद शिवशेट्टे ,डॉ. अजित मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर यांनी केले तर, आभार डॉ. हंसराज भोसले यांनी मानले.