• Wed. Apr 30th, 2025

युवकांसाठी ‘राहुल की गॅरंटी’; काँग्रेसच्या पाच मोठ्या घोषणा

Byjantaadmin

Mar 7, 2024

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये दाखल झाली. या यात्रेदरम्यान पक्षाचे नेते राहुल गांधी हे युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहेत. तसेच केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. आज त्यांनी देशातील युवकांसाठी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवकांना त्यांनी पाच ‘गॅरंटी’ दिल्या आहेत.राजस्थानमध्ये बांसवाडा येथे झालेल्या सभेत राहुल यांनी युवकांना साद घालण्याचा प्रयत्न केला. केंद्रात सत्ता आल्यास तब्बल 30 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, ही मोठी गॅरंटी राहुल गांधी यांनी आज दिली आहे. भरतीचे एक कॅलेंडर प्रसिद्ध केले जाईल आणि त्यानुसार नियोजित पद्धतीने भरती प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

पहिली नोकरी पक्की

प्रत्येक डिप्लोमाधारक किंवा पदवीधारकाला शासकीय किंवा खासगी क्षेत्रातील कंपनीत एक वर्षासाठी प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची हमी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा 8 हजार 500 रुपये भत्ता दिला जाईल.

पेपरफुटीतून मुक्तता

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पेपरफुटीतून सुटका करू, अशी घोषणा राहुल यांनी केली आहे. त्यासाठी स्वतंत्र कायदा केला जाईल. पेपरफुटीमुळे कोट्यवधी युवकांचे भविष्य अंधारात जात असल्याचे राहुल या वेळी म्हणाले. गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षा देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यासाठीही कायदा केला जाईल.

युवा रोशनी

चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवकांना कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअप निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निधीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाणार असल्याचे राहुल यांनी जाहीर केले. या घोषणांच्या माध्यमातून काँग्रेसने आगामीLOKSABHA निवडणुकीच्या तोंडावर युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *