
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर खुलेआम दावे करत असताना महाराष्ट्रातून त्यांना तीव्र विरोध होत आहे. दिल्ली दरबारी हा प्रश्न मांडताना मात्र आपल्या राज्यातील नेत्यांची एकजूट नसल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.
महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खासदारांनी कर्नाटककडून होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा दिल्लीत उचलून धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडला, तर शुक्रवारी तिन्ही पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांची एकजूट दिसावी म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने व खासदार श्रीरंग बारणे यांनाही मविआच्या शिष्टमंडळासोबत येण्याची विनंती केली. माने हे राज्य सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीचे वेगळे महत्त्व होते.
सुळेंच्या विनंतीला मान देऊन माने व बारणे हे दोघेही अमित शहांच्या कार्यालयात आले. मात्र त्यांना पाहताच तिथे उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांची तळपायाची आग मस्तकाला गेली. ‘हे दोघे सोबत येणार असतील तर आम्हीच बैठकीला येत नाही,’अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे नाइलाजाने सुळे यांना या दोघांना परत पाठवावे लागले.
अरविंद सावंत यांना आम्ही नको होतो : श्रीरंग बारणे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मतभेद बाजूला ठेवून आम्ही दोघेही बैठकीसाठी जाणार होतो. पण उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोध दर्शवला. आमच्यामुळे आघाडी तुटू नये. तुमच्यामुळे सीमा प्रश्न मार्गी लागत असेल तर तुम्हीच जा, असे सांगून आम्ही परत आलो.