उस्तुरीत आढळला १४३७ सालचा सतीशिळा शिलालेख
निलंगा : तालुक्यातील उस्तुरी येथील नागनाथेश्वर मंदिरातील एका सतीशिळा शल्पिावर शिलालेख आढळून आला असून त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी करून त्यातील महत्त्वपूर्ण माहितीचा प्रथमच उलगडा केला आहे.
पूर्वी पतीच्या निधना नंतर पत्नी ही पती सोबत चितेवर सती जात असे. अशा सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृतीमध्ये सतीशिल्प घडवले जात असत. काही सती शिळा शिल्पांवर शिलालेख आढळून येतात मात्र अशा शिलालेख असलेल्या सतीशिळा दुर्मिळ असतात. त्यातून तत्कालीन बरीच माहिती उपलब्ध होते. उस्तुरी येथे नागनाथेश्वर देवाचे जुने मंदिर आहे. याच मंदिराच्या समोर भिंतीला लावून एक सतीशीळा ठेवलेली आहे.
त्यावर देवनागरी लिपीत मराठी भाषेत १३ ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. शिळेवर सर्वांत खाली पतिपत्नी चितेवर सोबत दाखवले असून त्यावरील भागात सती घोड्यावर दाखवली आहे तसेच सतीचा हात व सर्वांत वर पतीपत्नी शिवंिलग पूजा करीत असल्याचे कोरले आहे. सूर्य चंद्र ही कोरलेले आहेत. शिळेवर हात जेथून निघतो त्या खांबावर सपाट भागावर शिलालेख खोदीव अक्षरांत कोरला आहे. शिलालेखाची सुरुवात स्वस्ती श्री या मंगल शब्दांनी झाली असून त्या नंतर तिथीचा उल्लेख आहे. शके १३५८ अनल संवत्सरे फाल्गुन शुद्ध पंचमी आदित्यवारी या तिथीला मेघांजेय ही देवलोकी प्राप्त झाली. सत्यलोकात तिच्या साठी पायघड्या घातल्या जात आहेत. तिची कीर्ती सर्वत्र पसरली आहे असे शिलालेखात कोरण्यात आले आहे. खालील २ ओळी खराब झाल्या आहेत. त्यात सखी सती असा उल्लेख आला आहे.
सदरील तिथीला इंग्रजी तारीख १० फेब्रुवारी १४३७ रविवार अशी येते. त्यावेळी ‘मेघांजेय’ ही स्त्री सती गेली आहे. सध्या सतीप्रथा अस्तीत्वात नसली तरी तत्कालीन समाजात ती किती खोल रुजली होती व समाजात त्याविषयी काय समज होते इत्यादी बाबींविषयी माहिती या शिलालेखातून उपलब्ध होत आहे. तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकणारा हा महत्त्वपूर्ण शिलालेख आहे. या कामात कृष्णा गुडदे यांना सचिन पवार, मंदिराचे शिवशंकर पुजारी, विश्वस्त संतोष शेट्टे यांची मदत झाली आहे.