• Wed. Apr 30th, 2025

पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभवही ऐतिहासिकच, दिल्ली जिंकणे हीच खरी कसोटी होती

Byjantaadmin

Dec 9, 2022

भाजपने गुजरात जिंकले तरी राजधानी दिल्लीतील महापालिका व हिमाचल प्रदेश हातचे गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभव ऐतिहासिकच म्हणावा लागेल, असा टोला उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेने लगावला आहे.

ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनात आज म्हटले आहे की, दिल्ली महापालिकेत भाजपची 15 वर्षे सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात ‘आप’ला यश आले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व पंतप्रधान मोदींचे राजकारणाचे केंद्रस्थान आहे. येथे मोदींची जादू का चालू शकली नाही? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता होती. तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे.

आमदार फोडण्याचा प्रयत्न चुकीचा

ठाकरे म्हणाले की, हिमाचलमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, पण त्यांचे आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजप असेल तर ते अनैतिक आहे. अर्थात भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता वगैरे शब्द निरर्थक आहेत. एकंदरीत गुजरात विजयाने भाजप जल्लोष करीत आहे. ते यश सर्वश्री मोदी यांचे आहे, पण दिल्ली व हिमाचल प्रदेश भाजपने गमावले त्यावर कोणीच बोलत नाही. असे का? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल.

ठाकरे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाताहत झाली. काँग्रेस किमान पन्नास जागांपर्यंत पोहोचेल व पराभवातही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काँग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. 1985 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आतापर्यंत कायम होता. यावेळी ‘149’ चा आकडा पार करू असे भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. तसा आकडा पार करून भाजपने नवा विक्रम निर्माण केला. भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो. हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल. गुजरातमध्ये भाजपच जिंकेल याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नव्हते.

ठाकरे म्हणाले, कोरोना काळात गुजरातमध्ये सर्वात जास्त हाहाकार माजला. इस्पितळांत जागा नव्हती. स्मशानात आप्तांचे मृतदेह घेऊन रांगा लागल्या होत्या. तरीही लोकांनी मोदींच्या पारडय़ात मते टाकली. हे त्यांच्या नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणेमुळे व पंतप्रधान असले तरी आपल्या गृहराज्याकडे बारीक लक्ष असल्यानेच घडले. निवडणुकीपूर्वी मोरबी पूल दुर्घटना घडली. दुःखाची लाट उसळली. पण त्या लाटेचा तडाखा मोदी लाटेस बसला नाही. कारण मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष आहेत. भूपेश पटेल हे मुख्यमंत्री म्हणून नवे होते. मंत्रिमंडळातून सर्व जुने चेहरे बदलून मोदी यांनी धक्का दिला. ती कोरी पाटी घेऊन मोदी निवडणुकीत उतरले. त्याचा फायदा झाला.

आप, MIMमुळे भाजपचा सहज विजय

ठाकरे म्हणाले की, मोदी यांच्यामुळे गुजरात प्रगतीपथावर वेगाने पुढे जात आहे. अनेक जगतिक दर्जाचे सोहळे गुजरातमध्ये होत आहेत व जागतिक नेते साबरमती, अहमदाबादेत उतरतात ते मोदींमुळेच. महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरातेत याच काळात पळवून नेले गेले. त्याचाही फायदा निवडणुकीत झालाच आहे. गुजरातमध्ये गांधी पिंवा सरदार पटेल यांचे भव्य पुतळे उभारले आहेत. पण मोदी हीच गुजरातची ओळख व अस्मिता आहे. गुजरातच्या मतदारांनी ते दाखवून दिले. ‘आप’ व केजरीवाल यांनी गुजरातेत येऊन फक्त हवा केली. गुजरातेत पुढचे सरकार आमचेच अशी बतावणी केली. त्यांच्या सभांना गर्दी झाली. पण ‘आप’ने काँग्रेसची मते खाल्ली. मतविभागणी घडवून एक प्रकारे भाजपचा विजय सहज केला. अर्थात ‘आप’ नसती तरी भाजपच जिंकणार होता. पण काँग्रेसची स्थिती कदाचित इतकी बिघडली नसती. गुजरातमध्ये आप व ‘एमआयएम’ने भाजपचा पराभव करण्यापेक्षा काँग्रेसचे नुकसान केले हेसुद्धा नाकारता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed