मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत शिवसेनेला ९, राष्ट्रवादीला ४ जागा देऊ करण्यात आल्या. पण भाजपचे मित्रपक्ष इतक्या कमी जागा घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे जागावाटप जाहीर झालेलं नाही.अकोला, जळगाव, संभाजी नगरात सभा घेतल्यानंतर अमित शहांनी मंगळवारी रात्री उशिरा सह्याद्रीवर शिंदे, पवार आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी शहांनी जागावाटपाचा प्रस्ताव दिला. त्याबद्दल शिंदे आणि अजित पवारांनी नाराजी बोलून दाखवली. ‘उद्धव ठाकरेंना सोडून १३ खासदार माझ्यासोबत आले. त्यामुळे माझ्या पक्षाला किमान १३ जागा हव्यात,’ अशी मागणी शिंदेंनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर अजित पवारांनी ९ जागा मागितल्या.यावेळी अमित शहांनी त्यांना विविध सर्व्हेक्षणांचा संदर्भ दिला. ‘तुमच्या पक्षांबद्दल, विद्यमान खासदारांबद्दल जनमानसात नाराजाची भावना आहे. लोकांमध्ये संताप आहे. तुमचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपला पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर, नावावर अधिक जागा लढू द्या. लोकसभा निवडणुकीत भाजपनं अधिकाधिक जागा जिकणं महत्त्वाचं आहे,’ असं शहा मित्रपक्षांच्या बैठकीत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत थोडी तडजोड करा. भाजपला जास्त जागा लढवू द्या. या नुकसानाची भरपाई वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करण्यात येईल, असा शब्द अमित शहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजपकडून दिला गेलेला जागावाटपाचा प्रस्ताव अमान्य असल्यानं अजित पवार उद्या दिल्लीला जाऊन भाजप नेतृत्त्वाशी चर्चा करणार आहे. यानंतर जागावाटपाचं अंतिम सूत्र जाहीर होईल.