लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. याकरिता आता विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कुठल्याही परिस्थितीत कमबॅक करायचं आहे. तर काँग्रेसला विजयाची परंपरा कायम ठेवायची आहे. दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी यांनी युवा नेतृत्वाला पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी, मी लढण्यास तयार आहे, असे वक्तव्य केले.

गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षासाठी सातत्याने काम करीत आहोत. पक्ष म्हणेल तर पूर्ण ताकदीनिशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकून आणू, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली. शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी शिवानी यांनी रास्त मागणी केल्याचे म्हटले आहे. शिवानी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने पक्षाचे काम करीत आहेत. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असेही वडेट्टीवार म्हणाले होते.
दुसऱ्या पक्षांतून आलेले जर उमेदवारी मागत असतील तर शिवानी वडेट्टीवारांच्या मागणीत गैर काय, असे म्हणत त्यांनी प्रतिभा धानोरकरांवर नान न घेता प्रहार केला. दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या या विधानानंतर शिवानी यांनी अनेकांच्या भेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांच्या भेटी घेतल्या. चंद्रपुरातील अनेक मान्यवरांच्या घरी जात त्यांना त्या आपली भूमिका पटवून देत आहेत.
CONGRESS व समविचारी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. एकाच दिवसात त्यांनी चंद्रपुरात अनेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. मागील लोकसभा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात BALU DHONORKAR यांनी विजय मिळविला होता. तब्बल चारदा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला होता. हा पराभव अहीर व भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता कुठल्याही स्थितीत चंद्रपूर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. अशात आता शिवानी वडेट्टीवार उमेदवारीच्या रेसमध्ये उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या ॲक्शन मोडवर आहेत. नुकतीच त्यांनी चंद्रपुरातील मान्यवरांची भेट घेऊन आपली भूमिका सांगितली व त्यांच्याकडून मार्गदर्शनदेखील घेतले.