मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधीतील महाविकास आघाडी यांच्यात सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी कालच सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची बैठक झाली. त्यात जागावाटपाचा मुद्दा निकालात निघाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मुंबईत महाविकास आघाडीची बैठक फोर सीझन्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात महायुतीला ४८ पैकी ३५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला सर्वाधिक २५, शिंदेंच्या शिवसेनेला ६ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळू शकतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुती मुसंडी मारण्याची शक्यता आहे.दुसरीकडे विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीला १३ जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे १३ पैकी ८ खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील. त्या खालोखाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ३, तर काँग्रेसचे २ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपनं काँग्रेसचे काही बडे नेते गळाला लावले. अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केले. या पक्षांतराचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.

काका, पुतण्यांमध्ये कोण वरचढ?
इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळू शकतात. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळतील असा अंदाज आहे. रायगड, मावळ, बारामती, कोल्हापूर या जागा अजित पवार गटात जिंकू शकतो. तर शरद पवार गट शिरुर, सातारा, माढा या जागा खिशात घालू शकतो. बारामतीत शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.