• Wed. Apr 30th, 2025

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा राजीनामा;भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा

Byjantaadmin

Mar 5, 2024

कोलकाता: कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी राजीनामा दिला. एका पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आणि येत्या ७ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार या प्रश्नावर गंगोपाध्याय म्हणाले, मी ज्या जागेवरून निवडणुक लढवणार त्याची माहिती तुम्हाला नक्की देणार.

राजीनामा आणि राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगत गंगोपाध्याय म्हणाले, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते सातत्याने माझ्यावर टीका करत आहेत. त्यांना कल्पना नाही की एखाद्या न्यायधीशाविरुद्ध असे बोलता येत नाही. त्यांनी केलेले घोटाळे समोर आले आहेत. आता मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कारण टीएमसीने मला मैदानात येऊन लढण्याचे आव्हान दिले. मी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमू्र्तींकडे राजीनामा दिला आहे.राजकारणात प्रवेश केल्याबद्दल आणि याआधीच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आपल्याविरुद्ध याचिका दाखल करावी असे आव्हान गंगोपाध्याय यांनी दिले.

टीएमसीने आरोप केले आहेत की, न्यायाधीश गंगोपाध्याय राजकारणात आल्याने त्यांनी याआधी दिलेल्या निर्णयांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. या आरोपांना उत्तर देताना गंगोपाध्याय म्हणाले, त्यांना (टीएमसी) कायद्याबद्दल काही माहिती नाही. ज्यांना काही चुकीचे वाटते त्यांनी माझ्याविरुद्ध याचिका दाखल करावी. पश्चिम बंगालमधील सध्याचे राजकीय वातावरण चांगले नाही आणि आपल्याला राज्यासाठी काही तरी करायचे आहे, असे ते म्हणाले. टीएमसी एक राजकीय पक्ष नसून नाटक करणारा ग्रुप असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.गंगोपाध्याय यांच्या मते, एक न्यायाधीश म्हणून मी लोकांच्या भल्यासाठी फार काही करू शकत नाही. त्यासाठीच न्यायपालिका सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक देखील केले. ते मेहनती व्यक्ती आहेत. राज्यात टीएमसीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मोदी फार मेहनत घेत आहेत आणि देशासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.गंगोपाध्याय यांनी २४ वर्ष वकीली केली होती. त्यानंतर २ मार्च २०१८ रोजी ते कोलकाता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश झाले. २०२० मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते नियमीत न्यायाधीश झाले. ते या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार होते, मात्र त्याआधीच गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला. भाजपकडून तामकुल मतदारसंघातून गंगोपाध्याय निवडणूक लढण्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed