काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रासध्या मध्य प्रदेशात आहे. ही यात्रा मंगळवारी शाजापूरला पोहोचली होती. त्या ठिकाणी एक रंजक चित्र पाहायला मिळाले. भारत जोडो न्याय यात्रा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसमोरच मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांनी राहुल गांधींना बटाटेही भेट दिले. ते बटाटे स्वीकारत राहुल यांनी संबंधित घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना दिलखुलास उत्तर दिले.भारत जोडो न्याय यात्रेत यापूर्वी कधी नाही अशी रंजक घटना मध्य प्रदेशात घडली. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसमोरच मोदी-मोदी असा नारा देत जोरजोरात घोषणाबाजी केली. तसेच जवळ जात त्यांनी गांधींना बटाटेही दिले. ते बटाटे स्वीकारत राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे थँक यू म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान, राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर भारत जोडो न्याय यात्रेतही आपले प्रेमाचे दुकान भाजप कार्यकर्त्यांसाठी उघडे केल्याची चर्चा यात्रेत रंगली.

दरम्यान, राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या योजनांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांबाबत ते म्हणाले, आमचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ. देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील लोकांना सुमारे 90 टक्के लोक आहेत. मात्र, त्यांना देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात स्थान दिसत नाही. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत.
राहुल यांनी अग्निवीरबाबत MODI सरकारला धारेवर धरले. पूर्वी देशातील तरुण सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत असे. सैनिक शहीद झाला तर त्याला हुतात्मा दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरांना सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे. कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षे भटकंती करूनही त्यांना रुजू करण्यात आले नाही. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला.दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेचा आज 52 वा दिवस आहे. राहुल गांधी मंगळवारी महाकालची नगरी असलेल्या उज्जैन येथे पोहोचतील. तेथे ते महादेवाचे दर्शन घेणार आहेत.