पावणेदोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केलं. हे आमदार आधी सुरतला गेले. त्यानंतर त्यांनी आसामच्या गुवाहाटीत मुक्काम ठोकला. त्यातील एक भयंकर प्रसंग सांगून अॅड. असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या आरोपाचे पुढे काय परिणाम होतील, हे लवकरच स्पष्ट होईल. ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी अॅड. असीम सरोदे आणि विश्वभंर चौधरी हे काल (3 मार्च) धाराशिवमध्ये आले होते. यावेळी केलेल्या भाषणात सरोदे यांनी अनेक गौप्यस्फोट आणि गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली.

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग आणि तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप अॅड असीम सरोदे यांनी त्यांच्या भाषणातून केला. दारुच्या नशेत तर्रर्र झालेल्या नेत्यांनी ते केल्याचा दावाही सरोदे यांनी केला. या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुवाहाटीत दोन आमदारांना मारहाण
‘गुवाहाटीमध्ये एक आमदार आठ किलोमीटर पळून गेला. त्याला परत आणून प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दुसऱ्याही आमदारास मारहाण केली गेली. या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली? गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये सगळे आमदार, मंत्री थांबले होते त्या हॉटेलमध्ये इतर ग्राहकांना येण्यास बंदी होती. परंतु त्याच हॉटेलमध्ये कराराअंतर्गत स्पाईस जेट आणि इंडिगो या कंपनीच्या काही रूम्स बुक करण्यात आलेल्या होत्या. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. त्यांचा विनयभंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला.’ हा सर्व प्रकार नेत्यांनी दारूच्या नशेत आणि झिंगेत केल्याचा आरोप सरोदे यांनी केला.
आज सगळीकडे लीडरची कमतरता आहे, मोठ्या पदांवर बसलेल्या मॅनेजर्सचे नरेंद्र मोदी, अमित शाह हे लीडर आहेत. ते स्वतः खूप मोठे मॅनेजर आहेत. राजकारण म्हणजे मॅनेजमेंट असते, असा त्यांचा भ्रम झालेला आहे, असेही सरोदे म्हणाले. मोदी, अमित शाह आणि भारतीय जनता पार्टी यांच्या प्रत्येक कामाचा उद्देश लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काही बोलू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये खोट आहे. कारण त्यांची नियत साफ नाही, असा आरोपही सरोदे यांनी केला.
आयोगावर मर्जीतील नियुक्त्या
निवडणूक आयोग कशाही पद्धतीने वागेल, अशा पद्धतीचे लोक नेमून निवडणूक आयोग त्यांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना तर शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ सुद्धा अजित पवारांना देण्यात आला आहे, असा आरोप सरोदे यांनी केला.
फडणवीस म्हणजे…
देवेंद्र फडणवीस हे किंचाळणारे, आरडाओरडा करणारे, काही पुरावा नसताना आरोप करणारे नेते आहेत. अशा फडणवीसवांना सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्याची टीका सरोदे यांनी केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील संस्कृतीप्रधान व सुसंस्कृत आणि नम्र राजकारणात ज्या नंबरी माणसाने ग्रह लावले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे हे सर्व गुंड प्रवृ्त्तीचे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशी परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिली आहे.’
भाजपकडून प्रादेशिक पक्षांना फोडण्याचे सुरू असलेले राजकारण, भाजप नियुक्त राज्यपालांची कार्यपद्धती आणि त्यांचा राज्यांच्या कारभारामध्ये होणारा हस्तक्षेप, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर, भाजपमध्ये वाढलेली घराणेशाही, भ्रष्टाचार यावरही सरोदे यांनी हल्ला केला.