शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांत वाद असतानाच आता इंदापुरातही वाद पुढे आला आहे. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर आरोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात या पत्रावरून चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र मी वाचलेले नाही. त्यामुळे मला याबद्दल माहिती नाही. आमचे आणि हर्षवर्धन पाटील यांचे नाते नेहमी जपले गेले आहे. हे कौटुंबिक नातं दोन्ही बाजूने जपलं गेले आहे, असे या पत्राबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

अतिथी देवो भव… लोकशाही आहे. ज्यांना निवडणूक लढायची आहे ते सर्वजण प्रचार करू शकतात. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी माझेही बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दोन राउंड झाले आहेत. जेवढे पाहुणे येतील त्यांचे स्वागत आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाईल, असे स्पष्ट केले. मुंबईत त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हे पूर्णपणे शेतकरीविरोधात आहेत. दिल्लीत आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील दुधासाठी या सरकारने पैसे देण्याची घोषणा केली होती. त्यातला एकही पैसा एकही लिटरमागे दिला गेला नाही. सोयाबीन, कांदा असेल याला मदत दिली नाही. काळ्या मातीशी इमान असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचे काम या सरकारने केले आहे. महानंदा चालवण्यासाठी अनेक चांगली आणि टॅलेंटेड लोकं आहेत. गोवर्धन आहे.. पुण्यातच आहे मंचरला त्यांची मोठी फॅक्ट्री असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना जर कार्यालय हवं असेल, तर त्यांनी तसं सरकारला सांगावे. त्यांना लगेच देऊ, पण त्यांना नाही देणार, सरकारला देऊ. सरकारने आम्हाला ती जागा लगेच देऊ, तसे पत्र सरकारला आम्ही देऊ. आम्ही कुठलीही जागा जमीन बेकायदेशीर ठेवली. शरद पवारांनी कधी बेकायदेशीर काम केलं नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) जे काही मिळवलं आहे ते स्वतःच्या ताकदीने मिळवले आहे, असेही सुळे म्हणाल्या.