बारामती: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वादांचे फटाके फुटू लागले आहेत. बारामती मतदारसंघात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून बारामतीतून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. पण महायुतीमधील नेत्यांमध्येच या मतदारसंघात संदोपसुंदी आहे. त्यामुळे त्याचा फटका सुनेत्रा यांना बसू शकतो.
बारामती लोकसभेत येणाऱ्या इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या लेटरबॉम्बनं एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मित्र पक्षांचे काही पदाधिकारी सभा घेत शिवराळ भाषेत माझ्यावर बेताल वक्तव्य करीत आहेत. मला तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देतात, असे गंभीर आरोप पाटलांनी पत्रातून केले आहेत.

हर्षवर्धन पाटलांचे आरोप काय? फडणवीसांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं
‘महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्त्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरु न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश घेऊन सहकार्य करावे ही विनंती’, असं पाटील यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे?
हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पत्रात मित्रपक्षाचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव नमूद केलेलं नाही. पण अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटलांचा रोख इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील १९९५ ते २०१४ या कालावधीत इंदापूरचे आमदार राहिले आहेत. आधी तीनदा अपक्ष आणि मग काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी बाजी मारली. या कालावधीत त्यांनी मंत्रिपदंही भूषवली.