लातुर, धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!
लातुर;-शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच धाराशिव,लातुर दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले अन् पक्षही फुटला. अशा संकटातही धाराशिव जिल्ह्यातील खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि शिवसैनिक एकनिष्ठ राहिले. सत्ताधारी शक्तीशी लढा देत ठामपणे उभे ठाकलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटणार, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार आहेत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात ते 7 व 8 मार्चला जनसंवाद मेळावे घेणार आहेत. त्यासोबतच धाराशिव येथे मुक्कामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविणार आहेत. या दौऱ्याप्रसंगी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याने ते काय बोलणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उद्धव ठाकरे हे धाराशिव लोकसभेत विविध ठिकाणी जनसंवाद मेळावे घेत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. गेल्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यात आले होते. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे याच्यावर सडकून टीका केली होती. आता उद्धव ठाकरे हे धाराशिव लातुर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी या टीकेचा समाचार ते कशा प्रकारे घेणार याकडे लक्ष लागेल आहे.
दोन दिवस धाराशिव लातुर जिल्हा दौऱ्यावर
औसा, लामजना चौक, उमरगा आणि तुळजापूर येथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे दौऱ्यादरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनालादेखील जाणार आहेत. गुरुवारी (7 मार्चला) उद्धव ठाकरे हे औसा, लामजना ,उमरगा, तुळजापूर येथे सभा घेतील. त्यानंतर धाराशिव येथे उद्धव ठाकरे मुक्कामी असतील. शक्रवारी (8 मार्चला) उद्धव ठाकरे वाशी, भूम, परांडा, बार्शी येथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या सभांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच धाराशिव दौरा असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते.
तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले यांच्या मतदारसंघात सभा
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजितसिंह पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. शिवसेना फुटल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धाराशिव- कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. तर परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत व उमरगा-लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात सहभागी झाले. या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे धाराशिव लोकसभेचा गड राखण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसे पाहता खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जनसंपर्क मोठा असल्याने महाविकास आघाडी ची मराठवाडात कन्फर्म जागा असल्याचे सांगितले जाते.
