जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर, : जिल्ह्यात गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे काही भागात आतापासूनच पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा लक्षात घेवून पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.लातूर शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा पिण्याकरिता आरक्षित करण्यात आला आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. लातूर शहर महानगरपालिकेने या पाणीसाठ्यानुसार शहरातील पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी. शहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी इतर पर्यायी उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आतापासूनच गावनिहाय उपाययोजनांची यादी तयार करावी. तसेच पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. कोणतेही गाव पाणी टंचाई उपाययोजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.