लातुरात झाली राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी 95 उद्योग घटकांसोबत झाले
1 हजार 340 कोटींचे सामंजस्य करार
· 3 हजार 758 जणांना मिळणार रोजगार
लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आज लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदार व व्यावसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 95 उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक अविनाश कामतकर, ‘मैत्री’ कक्षाचे पद्माकर हजारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके, व्यवस्थापक गोपाळ पवार यांच्यासह उद्योजक, बँकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणून लातूर जिल्हा हा विकासासाठी केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात 95 उद्योग स्थापन होणार असून यामध्ये सुमारे 1 हजार 340 कोटी रुपये गुंतवणूक होईल. तसेच यामधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात 3 हजार 758 रोजगार निर्माण होतील, असे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी प्रास्ताविकात सांगितले.
जिल्हास्तरीय उद्योग परिषदेतून नवउद्योजक घडतील : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्ह्यात नुकताच विभागीय नमो महारोजगार मेळावा झाला. यामध्ये हजारो मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद लातूर येथे होत आहे. या माध्यमातून नवउद्योजक निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रात येण्यासा युवक-युवतींनाही प्रेरणा मिळेल. जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत चागंले काम झाले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करणारा लातूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. लातूर जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय विकसित होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. लातूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने स्थानिक युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
जिल्हास्तरीय उद्योग परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनीतील उद्योजकांच्या दालनांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यांनी भेटील दिल्या. तसेच त्यांच्याकडून उद्योगाबाबत माहिती जाणून घेतली.