उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या अन्यथा शेतकर्यांना अफुची शेती करण्याचा परवाना द्यावा
– शेतकरी संघटनेचे लातूरच्या जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
लातूर – भारतीय किसान संघ परिसंघ अर्थात सिफा या शिखर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी हिताच्या मागण्या भारत सरकार व राष्ट्रपतींकडे केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा अन्यथा शेतकर्यांना अफूची शेती करण्याचा परवाना देण्यात यावा या व इतर मागण्यांचे निवेदन आज 29 फेबु्रवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान शेतकरी संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे व युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मिथून दिवे यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना देण्यात आले आहे.
शेतकर्यांना विनाअट संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, दुष्काळाचे अनुदान, विमा लागू करून शेतकर्यांना तात्काळ देण्यात यावा, बँकांनी सक्तीची कर्जवसुली बंद करावी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अन्यथा अफुची शेती करण्याचा परवाना देण्यात यावा, शेतकर्यांनी किटकनाशके, बियाणे, ट्रॅक्टर, कृषी यंत्रे यावरील जीएसटी काढून टाकण्यात यावी. मनरेगाच्या 80 टक्के निधी कृषी कामांशी जोडण्यात यावा. सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवावी. कृषी उत्पादनावरील निर्यात बंदी उठवावी, शेतकर्यांना विमा कंपनी निवडण्याचा पर्याया देण्यात यावा, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांची थकीत देणी तात्काळ द्यावीत, बंद साखर कारखाने सुरु करावेत अशा विविध बारा मागण्यांचा सदर निवेदनात समावेश आहे.

या मागण्यांचे निवेदन लातूर जिल्हाधिकार्यांना देणार्या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे लातूरचे नुतन जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, युवा प्रदेशाध्यक्ष मिथून दिवे, तालुकाध्यक्ष विकास नमनगे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय देवाप्पा, महेश बंग, विजयकुमार पाटील, अर्जुन जाधव, प्रतीक तेलंग यांच्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.